MSRTC Pass Scheme 2025:यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १६ जूनपासून होणार आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्येच मोफत प्रवास व सवलतीच्या पासचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळांमध्ये परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे बोनाफाईड मुख्यापकांनी दिल्यास त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘लालपरी’च्या प्रवासाचे पास मिळणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एसटीच्या बसगाड्यांमधून दरवर्षी सरासरी १५ लाख मुले-मुली मोफत पासद्वारे प्रवास करतात. मुलींसाठी १०० टक्के सवलत असून मुलांना तिकीट दराच्या ३४ टक्के शुल्क भरल्यास त्यांना देखील सवलतीचा पास मिळतो. एसटी महामंडळाच्या बसमधून सध्या ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के तर ७५ वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवास आहे.
तर लाडक्या बहिणींना ५० टक्के सवलत आहे. याच पद्धतीने शाळा-महाविद्यालयातील मुलींसाठी देखील मोफत प्रवासाची योजना लागू आहे. बहुतेक गावातून बससेवा नाही, पण महामार्गावर आल्यनंतर त्यांना बसमधून महाविद्यालयापर्यंत जाता येते. आता आपल्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्रित प्रवासाचे पास मिळावेत म्हणून प्राचार्य, मुख्याध्यापक, प्रचार्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.
मुला-मुलींना द्यावे लागणार बोनाफाईड
एलकेजी, युकेजी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व उच्च महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मोफत पासची योजना सुरू आहे. मुलींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना आहे.
योजनेतून मोफत पास काढण्यासाठी मुलींना किंवा मुलांना त्या शाळा-महाविद्यालयाचे बोनाफाईड व एक छायाचित्र द्यावे लागणार आहे.
मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना त्यांच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना मोफत बस पास द्यायचे असल्यास त्यांनी तसे पत्र महामंडळाच्या आगारप्रमुखांना द्यायचे आहे. त्यानुसार त्यांना त्यांच्या शाळेत पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
शाळा सुरू होताच कार्यवाही
परगावाहून शाळा-महाविद्यालयात मोठ्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळांमध्ये पास उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. शाळा सुरू होताच त्यानुसार आमचे आगार नियंत्रक कार्यवाही होईल.
– अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा