दिल्ली मेट्रो ही देशातील सर्वात शिस्तबद्ध आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. दररोज लाखो प्रवासी या मेट्रोचा वापर करतात. मात्र, काही लोकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे ही सुरक्षितताच धोक्यात येते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या व्हिडीओमध्ये एका महिलेने केलेली कृती पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. ‘मजाक’ म्हणून केलेलं हे कृत्य अनेकांना धक्कादायक वाटलं असून, सार्वजनिक ठिकाणी अशा वागणुकीला आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. हा व्हायरल व्हिडीओ दिल्ली मेट्रोच्या एका डब्यातील आहे. गर्दी असलेल्या मेट्रोमध्ये दोन महिला उभ्या असतात.
त्यापैकी एक महिला दुसऱ्या महिलेच्या अगदी मागे उभी असते. काही क्षणातच मागे उभ्या असलेल्या महिलेने अचानक समोर उभ्या असलेल्या महिलेला पायाने धक्का दिला. हा सगळा प्रकार मेट्रो स्टेशनवर थांबली असताना घडतो, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. व्हिडीओमध्ये दिसतं की, अचानक दिलेल्या धक्क्यामुळे समोर उभी असलेली महिला पूर्णपणे गोंधळून जाते. ती काही अंतर पुढे लडखडत जाते आणि थोडक्यात आपला तोल सावरते.
सुदैवाने ती खाली पडत नाही, अन्यथा गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर मागून धक्का देणारी महिला मात्र हसताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत नाही. उलट तिला हे सगळं मजेशीर वाटत असल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे जाणवतं. काही सेकंदांचा हा व्हिडीओ असला तरी त्याचा परिणाम मात्र मोठा झाला असता.